शिर्डी (वृत्तसंस्था) राज्यात एकापाठोपाठ एक सवलती जाहीर करून व्यवहार सुरळीत होत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र लॉकडाउन पाठ सोडायला तयार नाही. जिल्ह्यातील २१ गावांत १४ ते २३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासूनच या लॉकडाऊनला सुरुवात होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना वाढत असल्याचे दिसून येत आहे. रोज ५०० ते ८०० च्या दरम्यान नवीन रुग्ण बाधित रुग्ण आढळून येत आहे. नगर शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १० पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यात ६१ गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता यात आणखी २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नाही तर या लॉकडाऊन लागलेल्या गावात जमावबंदीही असेल. गावात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहिल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अहमदनगर, पारनेर, कोपरगाव, नेवासा, अकोले, श्रीगोंदा आदी तालुक्यांतील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.