नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतरच त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी करण्यात आला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना आता केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सुरक्षा देणार आहे. बंगालमध्ये भाजप नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. पुढच्या आदेशापर्यंत ही सुरक्षा मिथुन चक्रवर्ती यांना कायम राहील. नुकतंच, पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या ब्रिगेड परडे मैदानात पार पडलेल्या एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये दाखल झाले होते. ‘मी असली कोब्रा आहे. चावलो तर तुम्ही फोटोमध्ये जाल. मी जोलधरा साप नाही, बेलेबोरा सापही नाही… मी एक कोब्रा आहे. एका चाव्यात सगळं संपून जाईल’, अशी वक्तव्य मिथुन चक्रवर्ती यांनी यावेळी स्टेजवरून केली होती. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थे अंतर्गत मिथुन चक्रवर्ती यांना ११ कमांडोचं एक पथक सुरक्षा देणार आहे. याशिवाय ५५ सुरक्षारक्षकांची एक टीम त्यांच्या निवासस्थानाजवळ तसंच ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असेल.