मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात दोन ते तीन दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस कोसळला आहे. याचा परिणाम आता राज्यात देखील जाणवणार आहे. आज राज्यातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. अकोल्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
दरम्यान, दरवर्षी १७ ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परततो. ६ ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर, दरम्यान अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र आणि ईशान्यकडील काही राज्यात अडकला आहे. त्यामुळे राज्यातील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.