यावल (प्रतिनिधी) आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बुधवारी फैजपुर रोड वरील बसस्थानका समोर दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील एक-एक जण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रार दिली असून त्यानुसार दोन्ही गटातील २९ जणांविरुद्ध जीवेठार मारण्याचा प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल येथील आकाश मधुकर बिऱ्हाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी आंतरजातीय प्रेमविवाह केला असून या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे. आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकाकडून आम्ही रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जिवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात होत्या. मात्र पत्नीचे नातेवाईक असल्याने व तिचे सांगण्यावरून मी पोलिसात तक्रार दिली नव्हती. दि. २६ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मी यावल बस स्टॅन्डकडे माझी खाजगी कामानिमित्ताने जात असताना बस स्टॅन्ड समोर प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे, निलू सुरेश बारसे व अन्य १६ जनांनी माझी मोटरसायकल अडवत माझेवर बंदुक रोखत मला पकडून गाडीवरून ओढून खाली पाडले. त्याच वेळी हातातील लोखंडी फायटरने छातीवर पाठीवर मारहाण केली. इतरांनी लाथा बुक्क्यांनी तुडविले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी १८ संशयितांविरुद्ध जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटातील चंद्रकांत ऊर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या तकारीमध्ये म्हटले आहे की, ते सफाई कर्मचारी असून ते प्रविण सुरेश बारसे हे दोघ बस स्टॅड चौकात साफसफाई करत होती. यावेळी आकाश मधुकर बिऱ्हाडे हा त्याच्याजवळ आला. तो आम्हाला चिडवू लागला तसेच त्याने शिवीगाळ करीत त्याच्या साथीदारांनी अचानक आमच्यावर हल्ला करीत मारहाण केली. याप्रकरणी आकाश मधुकर बिऱ्हाडे यांचेसह ११ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली यावल पोलीस तपास करीत आहे.