यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात तरुणीला अंगावर ओढून मी तुझ्याशी प्रेम करतो, असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश ज्ञानेश्वर गिरी (वय ३२) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील एका गावात २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील शेताजवळ पिडीत तरुणी ही त्यांच्या गुरांसाठी चारा घेऊन घरी परत येत होती. याचवेळी संशयित आरोपी सुरेश गिरी हा पिडीत तरुणीचा छुपा पाठलाग करत आला आणि उजवा हात धरुनअंगावर ओढत मी तुझ्याशी प्रेम करतो, असे बोलून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, पिडीतेला शिवीगाळ करुन ही गोष्ट कुणास सांगितली तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी सुरेश गिरी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास नेताजी वंजारी हे करीत आहे.