चाळीसगाव (प्रतिनिधी) मंत्रालयातील तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकारी सर्व मंत्री असतील. हे सर्व तिजोरीच्या चावीवाले दोस्त आहेत त्यामुळे मतदारसंघाच्या विकासकामांसाठी हवा तेवढा निधी मागितल्यानंतर उपलब्ध होत असतो व तो मी आणला आहे. हा निधी शासनाच्या तिजोरीतून मिळत असल्याने हवी तेव्हा तिजोरी उघडत असतो, असे मी विनोदाने म्हणाल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कळवले आहे. जनतेच्या कामासाठी जनतेचाच कर रुपी पैसा (निधीच्या) रूपाने शासनाच्या तिजोरीतून उपलब्ध होणे हे अभिप्रेतच आहे व हा निधी मतदार संघात उपलब्ध करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी एक माध्यम आहे, असेही ते म्हणाले.
नेत्यांचा मोठे पणा सांगायचा होता : आमदार मंगेश चव्हाण
शासनाच्या तिजोरीचा उल्लेख कोणत्याही खाजगी कामासाठी मी केलेला नाही. आमचे महायुतीचे शासन व सर्व मंत्री गण निधी देण्यात कुठेही उणीव भासू देत नाही, मागेल तेव्हा निधी उपलब्ध करून देतात (म्हणजेच शासकीय तिजोरी उघडतात) व माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. हा माझ्या नेत्यांचा मोठेपणा मला या निमित्ताने मतदारसंघाच्या जनतेला सांगायचा होता. त्यामध्ये कोणतीही सत्तेची गुर्मी किंवा सत्तेचा दुरुपयोग असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. उलट माझ्या मागणी प्रमाणे महायुती शासनाने मागेल तेव्हा निधी उपलब्ध करून दिल्याने मला अभिमानच आहे आमच्या महायुतीचा शासनाचा. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ घेऊन दिशाभूल करणारी बातमी देण्याचा प्रयत्न केला आहे व त्यातून सामाजिक माध्यमांमध्ये देखील उलट सुलट प्रतिक्रिया येत असल्याने उपरोक्त माझी भूमिका ही जनतेसमोर ठेवत असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांनी कळवले आहे.