मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. संसदेत सचिन वाझे प्रकरण उचलून धरल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिली. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
काल लोकसभेत सचिन वाझे आणि १०० कोटींच्या वसुलीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खूप गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला कारागृहात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणी पत्र लिहिलं आहे.
मुंबईतील मनसुख हिरन मृत्युप्रकरणी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावलं. यापूर्वीही आपल्याला शिवसेनेच्या लेटरहेडवरून आणि फोनवरून अॅसिड हल्ल्यासह जिवे मारण्याची धमकावण्यात आलं आहे, असं राणा यांनी पत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस कारवाईची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
सचिन वझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा दबाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा सोमवारी संसेदत उपस्थित करण्यात आला. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या मुद्दा उचलून धरला. संसदेच्या दोन्ही सभागृहात या प्रकरणावरून गदारोळ झाला. गोंधळामुळे शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.