एरंडोल (प्रतिनिधी) शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश आबा महाजन (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात मयत उमेशच्या नातेवाईक यांनी दिलेली माहिती अशी की, उमेश आबा महाजन या तरुणाच्या वडिलांचा आपल्या नातेवाईकांसोबत शेतीवरून वाद होता. या वादातूनच आबा महाजन यांना मारहाण झाली होती. त्यानंतर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास उमेश हा नंदगाव जवळील शेतात गेला होता. शेतात असलेल्या नातेवाईकांना त्याने आपल्या वडिलांना मारहाणीचा जाब विचारला. त्यानंतर संबंधित नातेवाईकांनी उमेशला देखील लाथाबुक्क्यांनी आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत उमेशच्या पोटात आणि डोक्याला जबर मार बसला. यानंतर त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उमेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. तर काही जण एरंडोल पोलीस स्थानकात आरोपी नातेवाईकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असल्याचे कळते. दरम्यान,मयत उमेशचे मागील वर्षी जून महिन्यात लग्न झाले होते. दरम्यान, मयत उमेश हा एरंडोलचे नगरसेवक योगेश महाजन यांचा मावस भाऊ होता.