जळगाव (प्रतिनिधी) : प्रेम प्रकरणावरुन गेल्या वर्षभरापासून दोघ तरुणांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरु होते. याच वादातून डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. दशरथ नगर) या तरुणाचा संशयित शुभम रविंद्र सोनवणे (वय २५, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) याने धारदार चॉपरने छातीत आणि बरगड्यांमध्ये भोसकून निर्घण खून केला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. तेथून जाणारे पोलीस अंमलदार रमेश चौधरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच संशयित शुभम सोनवणे याला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
शहरातील दशरथ नगरात जय उर्फ साई हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. देवकर कॉलेज येथे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलगी त्याची मैत्रीण होती. त्या मुलीसोबत जय उर्फ साई याचे प्रेमसंबंध आहे या संशयावरुन गेल्या वर्षभरापासून मयत जय आणि संशयित शुभम सोनवणे यांच्यात वाद सुरु होते. संशयित शुभम हा जय उर्फ साई याला नेहमी खुन्नस देवन चाकने मारुन टाकेल अशी धमकी देत होता. याच वादातून बुधवारी दुपारच्या सुमारास जय उर्फ साई हा गोलाणी मार्केटमध्ये आला असता, संशयित शुभम सोनवणे हा तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण होवून झटापट झाली. त्यानंतर संशयित शुभम याने त्याच्याजवळील धारदार चॉपरने जय उर्फ साई गोराडे याच्या छातीत आणि बरगडीमध्ये वार करीत त्याला गंभीर जखमी केले.
उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत
तरुणावर धारदार चॉपरने वार झाल्यानंतर जखमी जय उर्फ साई हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यावेळी गर्दीतील काही तरुणांनी तात्काळ जखमीला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु जखमी जयची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
सहा महिन्यांपुर्वी मिटवले होते वाद
संशयित शुभम हा जयचा त्याच्या मैत्रीणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन वारंवार त्रास देत होता. तसेच ज्याठिकाणी भेटेल त्याठिकाणी खुन्नस आणि शिवीगाळ करीत मारहाण देखील करीत होता. यावेळी जयच्या काका दीपक गोराडे यांनी त्यांच्यातील वाद देखील मिटवले होते.
मित्रांसह नातेवाईकांची जिल्हा रुग्णालयात गर्दी
जय याचे वडील फोटोग्राफर असून त्याची आई देखील मोलमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. जय हा डिप्लोमाचे तर बहिण देखील शिक्षण घेत आहे. अडीच तीन वर्षांपुर्वीच तुकारामवाडी येथून दशरथ नगरात राहण्यासाठी गेले होते. या घटनेमुळे गोराडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी जयचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कॉलेजमधील मित्रांसह परिसरात राहणाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
















