चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करगाव तांडा क्र. ३ येथील एका २२ वर्षीय तरुणाने जुन्या वादाच्या कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील करगाव तांडा क्र. ३ येथील प्रविण नारायण जाधव (वय २२ रा. करगांव तांडा क्र.३ ता. चाळीसगाव) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १४ ऑगस्ट रोजी रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान मयताचा भाऊ अरविंद नारायण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रविण नारायण जाधव व उमेश पांडुरंग राठोड, राकेश पांडुरंग राठोड, राजेश पांडुरंग व छापाबाई पांडुरंग राठोड यांच्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून या चौघांकडून प्रविण नारायण जाधव यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे जुन्या वादाच्या कारणावरूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे आरोप घरच्यांनी केले आहेत.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत.