जळगाव (प्रतिनिधी) मागील भांडणाच्या कारणावरून रिक्षा चालक तरूणावर दोन जणांनी चॉपरने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना कौतिक नगरात घडली. गणेश भगवान लोहार (वय २६, रा. कौतिकनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कौतीक नगरात गणेश लोहार हे वास्तव्यास आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कौतिक नगरातील पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. तेव्हा गोपाळ अशोक कोळी व रोहित अशोक कोळी (दोन्ही रा. कौतिकनगर) यांनी गणेश याच्याशी मागील भांडणाच्या कारणातून वाद घातला, त्यानंतर त्यांनी गणेशवर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. उपचार घेतल्यानंतर त्याच्या फिर्यादीवरून कोळी बंधूंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















