पुणे (वृत्तसंस्था) खराडी भागातील एका सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत.
अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनसूया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या तीन युवती येळे यांच्याकडे भाडे तत्त्वावर राहायला आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व आरोपी याच सोसायटीत राहायला आहेत.
सोसायटीत राहणाऱ्या युवती सोसायटीच्या आवारात तोकडी वस्त्रे परिधान करून ये-जा करतात. त्याचा रहिवाशांना त्रास होतो, अशी तक्रार पठारे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री युवती राहत असलेल्या सदनिकेत सर्व आरोपी शिरले. त्यांनी युवतींना शिवीगाळ आणि मारहाणही केली तसेच मलाही धमकावले, असे येळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
















