छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) सख्ख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीला अनैतिक संबंधातून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार डीएनए चाचणीतून उघड झाला आहे. प्रकरणात पीडितेच्या भावासह मावस भावजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू संशयित मावस भावजीवर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे त्याला जामीन मिळाला आहे.
गंगापूर तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावजीने ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. मात्र नंतर पीडितेने २४ मार्च २०२३ रोजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचे म्हटले. नाताळच्या सुट्यात दहा दिवस भाऊ घरी होता. या दरम्यान त्याने वेळोवेळी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. मासिक पाळी न आल्यामुळे पिडीतेने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिने प्रेग्नंट किट आणून तपासणी केली. त्यात मुलगी गरोदर असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पाया खालची वाळूच सरकली. ही बाब भावाला सांगितल्यावर त्याने एका रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, बहीण गभर्वती राहिल्यानंतर भावाने पिडीतेला ‘ही बाब कुणाला सांगितली तर मी जीव देईल, अशी धमकी दिली. तसेच या प्रकरणात दुसरे कुणाचेही नावे घे, माझे नाव घेऊ नकोस म्हणून भावाने दम भरल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणात भाऊ व मावस भावजीच्या विरोधात भादंवि बलात्कार, पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
मावस भावजीचा जामीन अर्ज वैजापूर कोर्टाने फेटाळला होता. याविरोधात अॅड. रवींद्र गोरेंमार्फत खंडपीठात धाव घेतली. पीडितेचे भावासोबत अनैतिक संबंध होते, मावस भावजीचा संबंध नाही असा युक्तिवाद केला. त्यावर खंडपीठाने जामीन मंजूर केला.