नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माथेफिरू पतीने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना भानेगाव येथे २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता घडली. आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेने भानेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. रंजना मनोहर मनगटे (४७) असे मृतक महिलेचे, तर मनोहर काशिनाथ मनगटे (५५, दोघेही रा. वॉर्ड क्रमांक १, भानेगाव) असे आरोपी पतीचे आहे.
मनोहर हा मूळचा वारेगाव येथील रहिवासी असून वर्षभरापूर्वी तो कुटुंबासह वॉर्ड क्रमांक १, भानेगाव येथे राहायला आला होता. त्याला दोन मुले व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे. शनिवारी दुपारी मनोहर, पत्नी रंजना व मुलगा आनंद घरी होता. यावेळी रंजनाने डोकं दुखत आहे म्हणून मुलाला औषधीच्या दुकानात गोळी आणण्यासाठी पाठविले. हीच संधी साधून मनोहरने पत्नी रंजनाशी वाद घालून स्वयंपाकघरात मारहाण केली. जवळ असलेल्या नायलॉन दोरीने गळा आवळून तिचा खून केल्यानंतर पळून गेला. मनोहरच्या घरापासून काही अंतरावर मनोहरची भाची रेखा राकेश तांडेकर राहते. तिच्या घरी जाऊन मनोहरने ‘मी तुझ्या मामीला मारले. तू जाऊन बघून घे,’ असे म्हणून निघून गेला.
रेखा व तिच्या सासूने आरोपीच्या घरी स्वयंपाकघरात जाऊन बघितले असता रंजनाच्या गळा नायलॉन दोरीने आवळल्याचे, घटनास्थळी तुटलेल्या बांगड्या व रक्त दिसले. रंजनात जीव असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रंजनाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांसह दोन्ही मुलांना देण्यात आली. तोपर्यंत आरोपी मनोहरने खापरखेडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.