जळगाव (प्रतिनिधी) साडेनऊ लाख रुपयांचा लकी ड्रॉ लागल्याचे सांगून एका अज्ञात व्यक्तीने जळगावातील तरुणाची ४३ हजार ४५० रुपयांत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली हेमंत गुलाब चौधरी (रा. एसएमआयटी • कॉलेजजवळ मुक्ताईनगर) या ३४ वर्षीय तरुणाची ४३ हजार ४५० रुपयांची फसवणूक झाली आहे. मंगळवार, दि. २८ जून रोजी हेमंत चौधरी यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला, त्यानंतर त्यावर त्यांनी फोन केला. फोनवरील संबंधित व्यक्तीने त्यांना ‘लकी ड्रॉ’मध्ये साडेनऊ लाख रुपये लागल्याचे सांगितले. तसेच याबाबतच्या अटी व शर्तीची पूर्तता करण्यास आणि जीएसटीसाठी साडेनऊ हजार रूपये व ३३ हजार ९५० रुपये इन्कम टॅक्स जमा करण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी संबंधित व्यक्तीच्या ‘फोन पे’ वर पैसे पाठविले. मात्र, एक दिवस उलटूनही त्यांच्या खात्यावर लकी ड्रॉ ची रक्कम आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हेमंत चौधरी यांनी पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार हे करीत आहेत.