जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक नैराश्येतून तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाने राहत्या घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली येथील शिवाजी पंडीत सुने (वय-३२) हा बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतो. शिवाजी सुने हा विवाहित असून गेल्या दोन महिन्यांपासून पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाल्यामुळे पत्नी माहेर निघून गेल्या होत्या. तर दोन मोठे भाऊ विभक्त राहतात. तर शिवाजी हे आपल्या आईसोबत वेगळे राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्येत होते. दरम्यान १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या पुर्वी घरात कोणीही नसतांना घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आईच्या लक्षात आले. शेजारचाच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. मयत शिवाजीच्या पश्चात गणेश, लक्ष्मण हे दोन भाऊ व आई असा परिवार आहे.