जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मु.जे. महाविद्यालयात सुरू असलेल्या युवारंग महोत्सवात धार्मिक भावना दुखावणारे विडंबन नाट्य अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर स्पर्धेतून बाद करण्यात आले आहे.
मु.जे. महाविद्यालयात सुरू असलेल्या युवारंग महोत्सवात सोमवारी दुपारी रंगमंच क्रमांक एक वर विडंबन नाट्य कलाप्रकार सुरू असताना यात एका संघाने सादर केलेल्या स्कीटमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. समितीने हे स्कीट पुर्ण सादर करु दिले. नंतर संबधित महाविद्यालयास विडंबन या स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
विडंबन या कला प्रकारात जामनेर शहरातील एका महाविद्यालयातील संघाने नारद मुनींची भूमिका साकारली. या पात्रामुळे धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप अभावीपच्या कार्यकर्त्यांनी कलाप्रकार सादर होत असतानाच केला. यामुळे थोडा गोंधळ उडाल्यामुळे काही वेळासाठी सादरीकरणे थांबविण्यात आले. यानंतर काही वेळानंतर सामजस्याने या महाविद्यालयास सादरीकरण करु दिले. या प्रकारामुळे सायंकाळी पुन्हा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आयोजन समितीने अखेर संबधित महाविद्यालयास विडंबन या कलाप्रकारातून बाद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ने दिले आहे.