मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेनेच्या युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात बॅनर लावले गेले आहे. या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे.
देशात एकीकडे अच्छे दिन कधी येणार याची अतुरतेने सर्वसमान्य जनता प्रतीक्षा करत आहे. मात्र, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत असल्याने लोक त्रस्त आहेत. यामध्ये २०१५ आणि यानंतर २०२१ पर्यंत गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती किती वाढल्या आहेत, याचा तुलनात्मक उल्लेख करत थेट मोदी सरकारवर निशाना साधला गेला आहे. इतकंच नाही तर हेच अच्छे दिन आहेत का ? असा थेट प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, युवासेनेतर्फे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रातली मोदी सरकार हेच जबाबदार आहे असा आरोप करत याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा युवा सेनेतर्फे देण्यात आला आहे.
वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी स्पष्ट केलं आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिनपेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.
राजकीय पक्षही केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे याआधी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.. त्यात आता युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल पंपांवरच दरवाढीचे फलक झळकवले आहेत. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचसोबत सामान्यांना बसणारी झळ कमी करत केंद्र सरकारनं यावर लवकरात लवकर पाऊलं उचलत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवासेना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.