पुणे (वृत्तसंस्था) राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या (Zilla Parishad school teachers) बदल्या ॲप (App) माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदलीसाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. येत्या दोन आठवड्यात या ॲपचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून या ॲपच्या माध्यातून शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत अशी माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे.
ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी या ॲपच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर आयुष प्रसाद यांनी ही याबाबत माहिती दिली.
बदलीचा अर्ज भरण्यापासून नियुक्तीचे आदेश देण्याची संपूर्ण प्रक्रिया ॲपच्या माध्यमातून
आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले जात आहे. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ती स्वीकारत मोबाईल ॲप विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. बदलीचा अर्ज भरण्यापासून नियुक्तीचे आदेश देण्याची संपूर्ण प्रक्रिया यंदा या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. परिणामी शिक्षकांना यंदा बदल्यांची प्रक्रिया घरबसल्या पाहता येणार आहे.