मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, टीईटी घोटाळा, केंद्र सरकारमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान, स्वाईन फ्लू आजाराचा होत असलेला प्रसार, मुंबई व ठाणे शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा प्रचंड त्रास, वाहतूक कोंडी अशा विषयांवर विधान परिषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांतर्फे नियम २५९ अंतर्गत सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण मागील ४५ दिवसांत वाढले आहे. मुंबईमध्ये पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करु, अशी धमकी दिली जात आहे. सरकार अस्थिर असल्यामुळे गृह विभागाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यात वाळू माफियांनी उपद्रव माजवला असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळू माफियांना कोणाचेही भय राहिलेले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांवर एमपीडीए, मोक्का अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात रोगराई पसरली असून नवनवीन आजार उद्भवत आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली.