मुंबई (वृत्तसंस्था) इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले असून सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचे सांगितले आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले आहेत. दरम्यान कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. ज्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती. दरम्यान, इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही, त्यामुळे कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“