चाळीसगाव (प्रतिनिधी) औरंगाबादमधील कन्नड घाटात प्रचंड वाहतूक कोंडीचा कहर मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी चाळीसगाव महामार्ग पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत असते. याच मुद्द्यावर चाळीसगाव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोरपडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोरपडे यांनी याबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. घोरपडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाऊस असो रात्र असो रात्रंदिवस हा घाट मोकळा करण्यासाठी आणि प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी पोलिसांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागत असते, हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे. कन्नड घाटात खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले आहेत. जवळपास गुडघ्यापर्यंत खड्डे या घाटात आहेत. मोठमोठी वाहने जात असताना एखादे वाहन खड्ड्यात गेले की लगेच त्या वाहनाचा एखादा पार्ट तुटतो आणि ती गाडी तिथेच पडते रस्त्यात गाडी बंद पडतेय. त्यामुळे आजूबाजूने येणारी वाहने एकत्र आली की, लगेच घाटात वाहतूक कोंडी होते. दुतर्फा वाहतूक अगदी तीन-चार किलोमीटर होण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. अनेक वाहन चालकांना रात्रभर देखील गाडीमध्ये मुक्काम करावा लागतो. तर महिला लहान मुले अक्षरशः हैराण होतात. तेव्हा या घाटातील खड्डे बुजवून प्रवाशांना आणि पोलिसांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी देखील घोरपडे यांनी फेसबुक पोस्टवर केली आहे.
तीन वर्षापूर्वी वाहतूक होती दीड महिना बंद
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व आंध्र प्रदेश या पाच राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. या मार्गावर चाळीसगाव ते कन्नड दरम्यान नऊ कि.मी. लांबीचा औट्रम घाट आहे. तीन वर्षापूर्वी मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातील रस्ता खचल्याने तसेच दरड काेसळल्याने दुरुस्तीसाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. ताेपर्यंत घाटातून वाहतूक बंद होती. अाैरंगाबादहून येणारी व जाणारी वाहने राेहिणी, न्यायडाेंगरी, शिऊर बंगलामार्गे वळवण्यात आली होती. घाट दुरुस्तीच्या कामाचे तीन प्रस्ताव तातडीने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.