मुंबई वृत्त संस्था | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय. “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत असे राऊत म्हणाले.
“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.