सातारा (वृत्तसंस्था) तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा… देशाची परिस्थिती बिकट आहे हेच वास्तव आहे. कोरोनाची महासाथ, चीनशी संघर्ष आणि अर्थव्यवस्था या सर्वच आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची, जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार अपयश ठरले असून हे अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली असे त्यांनी सांगितले. ‘संविधानात सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूदच आहे. त्यामुळे सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही,’ अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.