धरणगाव (प्रतिनिधी) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी अशी ओळख असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची १३१ वी जयंती आज धरणगाव साहित्य कला मंचच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्मारकाच्या जागेत नविन औंदुबराचे रोपण सर्व मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कबचौउमविचे सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. स्मारकासाठी साहित्य कला मंच गेल्या ३० वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांची आणि राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यानंतर मान्यवरांनी बालकवींच्या प्रतिमेचे पूजन केले. स्मारक स्थळी बालकवींची औदुंबर कवितेच्या शिलालेखाचं अनावरण नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बालकवी म्हणजे धरणगावचे भुषण आहे. त्यांच्या स्मृती जतन करणं हे प्रत्येक धरणगावकरांचं कर्तव्य आहे. बालकवी स्मारकाचे काम रखडलेले असले तरी पुढील काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून आपण स्वतः त्यास गती देवू, असे श्री.चौधरी यावेळी म्हणाले.
माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, ओबिसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांनी समयोचित मनोगत व्यक्त करुन साहित्य कला मंचच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतूक केले. भविष्यात स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दिपक वाघमारे यांनी मंचला बालकवींची मूर्ती भेट देण्याची घोषणा केली. यानंतर मंचचे सचिव डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी मंचतर्फे दिले जाणारे बालकवी पुरस्कारांची मागील परंपरा सांगत २०२१ च्या पुरस्कारांची घोषणा केली. पुण्याचे देवा झिंझाड आणि नाशिकचे राजेंद्र उगले यांना राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार जाहिर करण्यात आले. सर्वांच्या आग्रहाखातर प्रा. बी.एन.चौधरी यांनी औदुंबर या कवितेचे सुश्राव्य गायन करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली.
धरणगावची जनता, नेते आणि पत्रकार हे सामाजिक बांधिलकी जपत चांगल्या कामासाठी आपले मतभेद विसरुन एकत्र येतात हीच धरणगावची ताकत आहे असे प्रतिपादन प्रा. डी. आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. तसेच स्मारक अस्तित्वात आल्यावर विद्यापिठातर्फे येथे अध्यासन केंद्र सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास पवार यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर नेरपगार, बी. डी. शिरसाठ, आर. के. सपकाळे, शैलेश भाटीया, आबा महाजन, पुनित थोरात, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, लोकेश चौधरी, भोजराज चौधरी, गोपाल पाटील यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील शिक्षक, साहित्यिक, नगरसेवक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी विविध शोभेची रोपं आणि वसुंधरा अभियानाचे शुभेच्छा फलकं प्रवाशांना आकर्षित करत होते.