धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील तेली तलावाची काही प्रमाणात साफ-सफाई करण्यात आली. परंतू दुर्गंधी कायम असल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
तेली तलाव परिसरात धरणगावकरांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेले सिध्दी हनुमान मंदीर व ग्रामदैवत मरीआईचे मंदीर आहे. येथे दररोज शेकोडो भाविक मोठ्या श्रध्देने व भावनेने दर्शनाला येत असतात. परंतु तलावातील घाणीमुळे सर्वत्र दुर्गधीमुळे भाविकांसह नागरीक त्रस्त झाले होते. मच्छिमारांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने कुठलीही पावडर वजा केमिकल टाकू नये, अशी विनंती मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
मच्छीमार सोसायटीच्या सदस्यांनी आम्ही स्वतः तलाव स्वच्छ करून देतो, तलावात कुठलीही पावडर टाकू नका अशी विनंती केली. त्यानुसार तलावाची स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतू काही प्रमाणात स्वच्छता करून देखील तलावातील दुर्गंधी कायम असल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तसेच जीवघेणी दुर्गंधी मिटविण्यासाठी आता ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मच्छीमार बांधवांचे देखील लाखोंचे मासे तलावात आहेत. त्यामुळे पालिकेने कुणाचे ही नुकसान होणार नाही, याची काळजी घेत दुर्घंधीपासून मुक्तीसाठी अत्याधुनिक उपाय योजना राबवावी, अशी मागणी देखील होत आहे.