कोलकाता (वृत्तसंस्था) गुजरात आणि कर्नाटकच्या रस्ता अपघाताची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये धुक्यामुळे एक मोठा अपघात घडलाय. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.०५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एक डंपर नदीतील खडी घेऊन जात होता. तर समोरून विरुद्ध दिशेनं टाटा मॅजिक आणि मारुती व्हॅन येत होती. धुके असल्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही त्यामुळे तिन्ही वाहनांनी एकमेकांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, खडीने भरलेला डंपर इतर वाहनांवर कोसळला. त्यामुळे खडी खाली इतर वाहनं अडकली आणि यात त्यांचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. खडीने भरलेला डंपर हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत असताना हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात १८ जण जखमी झाले आहे. जखमींना धुपगुडी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धुकामुळे झालेल्या या अपघातात अनेक वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल असून मदतकार्य सुरू आहे. मृत व्यक्तींचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.