नागपूर (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेनेवर दावा केला, तर हा प्रश्न निवडणूक आयुक्तांकडे जाऊ शकतो, असे मत प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर, शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
राज्यातल्या तिढ्यावर बोलताना अॅड. निकम म्हणाले की, काँग्रेस फुटली. त्यानंतर इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस, असे दोन भाग झाले. काँग्रेसच्या चिन्हावरून वाद झाला. तेव्हा एकसंघ काँग्रेसचे बैलजोडी हे राजकीय चिन्ह नंतर गाय वासरू झाले आणि नंतर मग पंजा आला. हा रजंक किस्सा निकम यांनी सांगितला.
शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही
शिवसेनेसोबत बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना गट स्थापन करून एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, बंडखोर आमदारांना आपला गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. ते शिवसेनेतून बाहेर गेले नाहीत. अॅड. निकम म्हणाले की, आम्ही वेगळा गट असून शिवसेनेच्या मूळ विचारांचे पाईक आहोत, असे बंडखोरांचा गट सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन वेगळे गट आता दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब शिवसेना, असे दोन गट पुढील काळात कार्यरत असण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या पक्षाचे कॅडर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. आम्ही बाळासाहेब शिवसेना आहे, असे शिंदे गट कितीही सांगत असला तरीही शिवसेनेवर त्यांचा कब्जा होऊ शकत नाही. कारण पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचे निकम यांनी नमूद केले.
वेगळा गट का केला?
ॲड. निकम पुढे म्हणाले की, मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांना एखाद्या राजकीय पक्षात विलीन होण्याची गरज नाही. कारण आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही असे ते सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला आम्ही पुढे नेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला भाजपच्या सोबत मिळून पुढे न्यायचा आहे. म्हणून शिवसेना बाळासाहेब असा वेगळा गट तयार केला आहे.