औरंगाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानमध्ये १८ वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर औरंगाबाद येथील रहिवासी ६५ वर्षीय हसीना बेगम मंगळवारी आपल्या घरी परतल्या. २००२ मध्ये ती आपल्या पतीच्या नातलगांना भेट देण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. त्यांचा पासपोर्ट हरवल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात डांबले. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (२६ जानेवारी) त्या भारतात परतल्या.
भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलिसांनी त्यांचे स्वागत केले. घरी परतल्यानंतर हसीना म्हणाल्या की, “मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतंय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आलं आहे. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यावर दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि तीन दिवसांपूर्वी तिला तुरुंगातून सोडण्यात आले. मंगळवारी ती पंजाबमार्गे औरंगाबादला पोहोचली.
लाहोरमध्ये हरवला होता पासपोर्ट
हसीना औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशन परिसरातील रशीदपुरा येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी दिलशाद अहमद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पतीने नातेवाईक पाकिस्तानात राहतात. त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या. दरम्यान लाहोरमध्ये हसीना यांचा पासपोर्ट हरवला. हसीना पासपोर्टविनाच पाकिस्तानात आल्याचा पाकिस्तान पोलिसांनी आरोप केला. या कारणास्तव, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.