▪डॉ. संजीवकुमार सोनवणे
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नाही तर एक सामाजिक विचार आहे. दीनदलितांच्या उद्धारासाठी आणि अखिल भारतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची रूजूवात करण्यासाठी आपले सारे आयुष्य वेचणार्या या महामानवाविषयी अफाट लेखन झाले आहे, होत आहे. जगातील हा एकमेव नेता आहे की, ज्याची जयंती ही एक मोठा सण ,उत्सव म्हणून साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्रियांना नेहमीच आदराची आणि मानाचे स्थान दिले. खानदेशातील स्रियांनी आपल्या अहिराणी ओवी गीतातून बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व अधोरेखित केले आहे. खानदेशात ज्या प्रमाणे विविध प्रसंगी,सण उत्सवात गीतं गायली जातात, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या जयंती सणालालाच नव्हे तर विविध प्रसंगी ओवी स्वरुप गाणी गायली जातात, खानदेशातील स्रियांचा हा मौखिक परंपरेचा ठेवा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी उच्चारले तरी अंगावर आनंदाचे भरते येते, बाबासाहेब हे नाव एक ऊर्जा म्हणून सामर्थ्य बहाल करतं. मग आपसूकच शब्द बाहेर पडतात,
भिम भिम करु,
भीम कानमांन सोनं
सोनाले लागे ऊन
कितलं झाकू मी पदरानं..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मौल्यवान दागिन्यांची उपमा दिली आहे.वास्तविक गोरगरिबीने या पिचलेल्या या स्रियांकडे सोने, चांदी, हिरे माणिक यांचे दागिने नाहीत, पण आपला उद्धारकर्ता म्हणजेच बाबासाहेब हाच आपला निर्णय दागिना आहे,अशी उपमा दर्शवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य हेच महाकाव्याचा विषय झाला आहे. त्यांच्या केवळ नावानेच सूर्यकूल जागे होतं.
भीम भीम करु, भीम मोत्यानी फुली
भिममुळे चेटण्यात, वस्तीमान्या चुली
बाबासाहेब हे या सूर्यकूलाचे क्रांतिपर्व आहे. त्यांच्यामुळेच अंधारलेल्या वस्त्या उजळून निघाल्या आहेत. सगळीकडे भिम नामाची पहाट उगवली आहे. शोषित वंचितांच्या जीवनात उजेड पसरला आहे.
भिम भिम करू, भिमले कयात पुरणपोया
भिम ऊना जेवाले, धन्य झायात आयाबाया
कोणत्याही सण उत्साहात खानदेशमध्ये खीर पुरणपोळी बनविण्याची पद्धत आहे. या जयंती सणालाही पुरणपोळी बनवून भिमाला जेवणासाठी घरी बोलावण्याची तिची भावना आहे. बाबासाहेब आपल्या घरी येतील या कल्पनेनेच ती हुरळून गेली आहे.
दगडना तू देव, तुले कसाना भाव
उना भिम जलमले, तो करी न्यावं
पिढ्यानपिढ्या अन्याय, अत्याचार सहन करीत जगणाऱ्या अस्पृश्यांना अतिशय हीन दीन आणि तुच्छ वागणूक मिळाली. हिंदू धर्मातील एकाही देवाला कणव आली नाही. पण एकट्या बाबासाहेबांच्या जन्मामुळे दीन दलितांची कोटीच्या कुळे उद्धरली आहेत. म्हणून ती म्हणते,
राम राम ईसरा, आते करा जयभीम
भिमनी कया चमत्कार, पलटी गयात दिन
बाबासाहेबांच्या येण्याने या स्रियांचे सर्व जीवनच पालटून गेले आहे. ती राम राम, जोहार मायबाप विसरून जयभीम चा जयघोष करीत आहे. जे शेकडो वर्षांपासून देवांना जमले नाही ते एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने करुन दाखवले आहे.
भिम गया ईलायतले,रमा देखे वाट
भिमनी कया त्याग, आपले दिसनी पहाट
केवळ बाबासाहेबांमुळेच तिच्या आयुष्यात सोन्याची पहाट उगवली आहे. बाबासाहेब जेव्हा विलायतेला गेले तेव्हा रमाबाई खूप वाट पाहत होत्या पण बाबासाहेबांनी रमाईचा त्याग केला, ही भावनाच मोठी आहे.
लेक मी भिमनी, माय मन्ही रमाई
मन्हा भिमनी पुन्याई, झायी जलमनी कमाई
ही भिमा -रमाईची लेक आहे ,तिला बाबासाहेब म्हणजे आपल्या जन्माची कमाई वाटते आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनीच तिला माणुसकीचे आणि सन्मानाचे दिवस बहाल केले आहेत. बाबासाहेबांना ती माऊलीचे स्थान बहाल करते म्हणून त्यांचा उल्लेख ती’ माऊली’ असा करते आणि आपले भावनिक नातं जोडते.
भिम भिम करू, भिम मायानं पाखरू
भिमनी करी साया, गाढ झोपणं लेकरू…
बाबासाहेबांच्या पुण्याईने या स्रिया आणि त्यांची लेकरं सुखाची झोप घेत आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच तिचे आयुष्य हे सुरक्षित झाले आहे. संविधानातील तरतुदी मुळेच तिचे जगणे सुसह्य झाले आहे. खानदेशातील स्रियांच्या मुखातून बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व ओवी गीतांद्वारे प्रवाहित झालेले आहे.
भिमजयंतीला तर साऱ्या वाडा वस्त्यांवर आनंदाचा एक वेगळाच माहौल असतो. या जयंती सणाला सासुरवाशीण माहेरी येते ,नवनवीन कपडे घेतात, गोडधोड जेवण तयार करतात. एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि संध्याकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची वाजत गाजत आणि नाचत नुचत गावभर मिरवणूक निघते. रात्री आयाबाया भिमचौकात जमून गाणी गातात.
भिम भिम करू, भिम सोनाना ताट
भिमनी ऊनी जयंती, सगी गलीमा साखर वाट
भिमजयंतीला सार्या वस्तीला साखर वाटली जाते. १४ एप्रिल हा दिवस आत्यंतिक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे.या दिवसाला भावनिक वलय निर्माण झाले आहे. सोन्याच्या ताटातून साखर वाटण्याचा दिवस आहे.
भिम भिम करू, भिम तयहातना फोड
भिमनं नाव लेता, सग्या दिन जास गोड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या स्रिया आपल्या ओव्यांमधून’ भिम ‘आणि ‘बाबा ‘अशा पवित्र नावांनी वर्णितात.या नावांशी त्यांचे भावनिक नातं जोडले गेले आहे. म्हणून ती आपल्या भिमाला तळहातावर झालेल्या फोडाप्रमाणे जपते आहे. भिमाचं नाव घेतल्यावरच तिचा दिवस गोड आणि आनंदी जातो. आपल्या भिमासाठी ती आत्मबलिदानाची तयारी ठेवते.
भिम भिम करू, भिम गयामानं चांदीनं पदक
भिमना फोटो ओवाडाले, घडं सोनानं तबक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आत्यंतिक आदर व्यक्त करण्यासाठी हिरे माणिक या मौल्यवान धातूंचा उपमा म्हणून वापर केलेला आहे. भिमाला गळ्यातील चांदीच्या पदकाची उपमा दिली आहे आणि भिमाचा फोटोला ओवाळण्यासाठी सोन्याचे ताट घडवायचा तिचा विचार आहे. पोटभर अन्न नाही मिळालं तरी चालेल पण भिमासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, हे ती निक्षून सांगते आहे.
भिमरूपी ईज चमकनी, उजाये पडनं लख्ख
भिमनं उजाये देखी, अंधारं व्हयनं थक्क
बाबासाहेब हे सामान्य व्यक्ती नाही तर आकाशातली वीज आहे, ही वीज कडाडल्यावर अन्याय, अत्याचार, अपमान.विषमता आणि अज्ञानाचा अंधार कुठल्या कुठे गायब झाला. या भिमरूपी वीजेच्या प्रकाशाने गावकुसाबाहेरच्या वाडा वस्त्या उजळून निघाल्या आहेत.
मन्हा भिमबाबानी, ठोकी दिल्लीमा आराई
बाबानी आराई ऐकी, दुस्मननी झोप गयी उडी
बाबासाहेबांनी संसदेत दीन दलितांची दुःखे मांडली, समतेचा आणि मानवतेचा लढा दिला. बाबासाहेबांची ही ललकारी ऐकून सनातन्यांची झोप उडाली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेन तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे सांगून बाबासाहेबांनी ज्ञान हेच गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध करून दाखविले. विषमतावादी समाजव्यवस्थेला उद्वस्त करायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी ठासून सांगितले.
भिमबाबानी सांगं आपले, तुमी मन लाई शिका
पैसानं करता कोनले, तुम्ही शील नको ईका
शिक्षण हे मानवाच्या उत्कर्षाचे प्रभावी माध्यम आहे.’ शिक्षण म्हणजेच जाणीव जागृती निर्माण करणं होय.’एकदा का माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली की, त्याला कोणीही फसवू शकत नाही. म्हणून त्यांनी आपल्या समाजबांधवांना शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. यासोबतच त्यांनी शील, चारित्र्य, नीती यांची आपल्या व्यक्तित्वात रूजवणूक करण्याचा आग्रह धरला. बाबासाहेबांच्या मते, आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही तर शिक्षणासोबतच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. म्हणून या ओवी गीतात पैशांसाठी शील विकू नका हा विचार पेरला आहे.
गावगाड्याची कामे सोडून शिक्षणाची कास धरावी, असे बाबासाहेबांचे आवाहन या ओवीगीतातून व्यक्त होते.
वढू नका मरेल ढोरे, द्या बदकाम सोडी
पोरेस्ले सायमा धाडा, लावा शिकानी गोडी
आजही समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व प्रमाणित झाले आहे, पूर्वी गावगाड्याची कामे करणारा हा समाज आता शिक्षणाची कास धरुन आहे. शिक्षणाने स्वाभिमान जागृत होतो, आत्मभान येते, आत्मजाणीव निर्माण होते. शिक्षणामुळे हा समाज किती जागृत झाला आहे की, त्याला समाजामध्ये दिमाखाने वावरतो आहे. अहिराणी बोलीभाषेतील ही स्री शिक्षणाने समाजात झालेला कायापालट अगदी चपखल शब्दात मांडते.
भिम भिम करू, भिम सग्यास्मा हुशार
भिमनं ग्यान ऐकी, दुस्मन व्हयी गया बेजार
भिमना व्हयना जलम, जशी चमकनी ईज
भिम जाये शायमा, दुस्मनले लागे खीज
भिम भिम करू, भिमनी गाडीले काचना भिंग
भिमनं ग्यान देखी, सग्या व्हयी ग्यात दंग
आठूय दिसे माले, दिल्ली गावनं पानी
मन्हा भिमबाबाथिन, नही कोनी ग्यानी
भिम भिम करू, भिम सोनानी व साकी
भिमनं ग्यान देखी ,दुस्मन गया आकी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला बहुमूल्य अशी घटना लिहून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मानवकेद्रीत अशी ही घटना या स्री ला मायेचा पदर वाटतो आहे. ही स्री म्हणते,
भिम भिम करू, भिम जसा मायना पदर
भिमनी करा कायदा, गरीब दुव्याले वाटे आधार
भिम भिम करू, भिम हिरामोतीनी खाण
भिमनी करा कायदा, भेटाले लागना मानपान
या स्रिला भारतीय राज्यघटनेचा आधार वाटतो. एक व्यक्ती एक मत ही कल्पना राबवून बाबासाहेबांनी रस्त्यावरच्या भिकार्यापासून ते टाटा बिर्ला पर्यतच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करुन समतेचे सूत्र प्रत्यक्षात अंमलात आणले. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे हिरा मोतीपेक्षाही अमूल्य आहे. कोहिनूर हिराही लाजावा, इतकं बहुमोल आहे. भिमाने केलेला कायदा म्हणजेच राज्यघटना. या घटनेच्या माध्यमातूनच आज दीन दलित, आदिवासींना आरक्षण मिळाले. अस्पृश्यता बंद झाली. शिक्षणाची समान संधी मिळाली. अज्ञान आणि दारिद्र्य पंकात घोरत पडलेल्या समाजाला आत्मभानाची जाणीव निर्माण करून दिली. आज हा समाज प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतो आहे. आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधताना दिसतो आहे. त्याला भारतीय राज्यघटनेने मानसन्मान प्राप्त करून दिला आहे, ही सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची किमया आहे. हीच किमया खानदेशातील अहिराणी बोलीभाषेतील ओवीगीतात प्रतीत होताना दिसत आहे.
▪डॉ. संजीवकुमार सोनवणे
सम्यक, ३२३/१अ, प्लाॅट नं. ११,
चिंतामणी मोरया परिसर,
धरणगाव, जि. जळगाव,
४२५१०५
(लेखक महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी तथा साहित्यिक आहेत. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाच्या लेखन व समीक्षा मंडळ विश्वकोश निर्मिती महामंडळाचेही सदस्य आहेत.)