अमळनेर (प्रतिनिधी) जगाच्या कानाकोप-यात कुठेही असले तरी मातृभूमीविषयीची तळमळ काहींना अजिबात स्वस्थ बसू देत नाही. याच जाणिवेतून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जर्मनीस्थित डॉ.प्रविण पाटील, त्यांचे मित्र डॉ. शांताराम शेणई,सिंगापूर स्थित नंदलाल पाटील यांनी ख़ास शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून बागायत बाजार (आपला बाजार आपल्या हातात), हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर हे अॅप लॉचं केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रामुख्याने शेतकर्यांसाठी नवीन उपक्रम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा आणि आधुनिक शेती विषयी माहिती व त्याची ट्रेनिंग देणे हा सुद्धा त्यांचा एक उद्देशआहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी अनुभवल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. ह्या अॅपच्या मदतीने शेतकरी एकमेकांसोबत जोडले जातील आणि एका मोठ्या शेतकरी कुटुंबाचा हिस्सा बनतील. ह्या अॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या शेती संबंधित साहित्य, पशु-पक्षी, वाहने आणि बरेच काही वस्तु ज्या पडुन-पडुन ख़राब होतात, जसे पाईप,पंप इत्यादी खरेदी विक्री करु शकतात. तसेच शेतीसंबंधित वाहने भाड्याने देणे-घेणे इत्यादी करू शकतात. त्यांना स्वतःला अनुभव आहे की शेतक-याला आजच्या घडीला जर बैल ,म्हैस विकायचे असतील तर वाहन (टेम्पो) करून, तो प्राणी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावा लागतो. एवढा वाहतूक खर्च करून बाजारात आल्यामुळे तो अनपेक्षित किमतीत विकावा लागतो किंवा पुन्हा खर्च करून घरी परत आणावा लागतो. यात पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतात.
ह्या अॅपचा वापर करून जर आपण बैल ,म्हैस याविषयी माहिती आणि फोटो पोस्ट केला तर शेतकऱ्याला घरी बसल्या गिऱ्हाईक मिळेल. विकत घेणारा आणि विकणारा दोघांचा वेळ आणि पैसा वाचेल. एखादा शेतकरी वाहन/ट्रॅक्टर भाड्याने देत असेल तर तो आपल्या अॅपचा उपयोग करून वाहना विषयी माहिती पोस्ट करू शकतो आणि त्याला घरी बसल्या गिऱ्हाईक मिळतील. यात भाड्याने घेणारा आणि देणारा दोघांचाही फायदा होईल. ही फक्त काही उदाहरणे झालीत अशी भरपूर उदाहरणे आहेत की ज्यामुळे ह्या अॅपचा वापर करून शेतक-यांच्या आयुष्यात काही गोष्टी सोप्या आणि कमी खर्चात होतील. सर्वात महत्वाचे सांगायचे म्हटले तर शेतकऱ्यांना ह्या सर्व सुविधा विनामूल्य मिळणार आहे. वरील सर्व सेवा त्यांनी पहिल्या टप्प्यात (‘फेज-वन’) मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. जर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढील टप्प्यात अजून काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत.
उदाहरणार्थः
१. अॅपद्वारे शेतकऱ्यांना शेती विषयक शासकीय योजनांची माहिती आणि संकेत स्थळ उपलब्ध करून देणे.
२. शेती विषयक चर्चा , शेतकरी फोरम च्या मदतीने शेतकरी एकमेकांना शेतीविषयक सल्ले, प्रश्न विचारू शकतो. जसे पीकावरील रोग, योग्य बियाणे खत विषयी माहिती इत्यादी
३. महिला बचत गट किंवा शेतकरी कुटुंबाने घरी बनवलेल्या वस्तू आणि पदार्थ विक्रीसाठी या ॲपचा उपयोग होऊ शकतो जसे लोणची,पापड, मसाला त्याचप्रमाणे भाज्या, फुले ,फळे इत्यादी
४. शेतीविषयक सेवा आणि व्यापार यासाठी जाहिरात -उदाहरणार्थ बोअरवेल करणारे, बांधकाम करणारे, विहिर खोदणारे, पीक व प्राणी विमा देणारे, बी -बियाणे विकणारे इत्यादी
शेतकऱ्याची प्रतिक्रिया
अॅप लाँच झाल्यानंतर प्रथम मी माझ्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केले.माझ्याकडे असलेले रोटव्हेटर जे मी २ वर्षांपासून मित्रांना सांगुन विक्रीचा प्रयत्न करत होतो पण काही केल्या विक्री होत नव्हते.बागायत बाजार अॅपमध्ये मी रोटव्हेटरचा फोटो टाकल्यानंतर थोड्याच वेळात अपेक्षित किमतीत त्याची विक्री मला घर बसल्या करता आली.
(नंदलाल हिलाल पाटील, शेतकरी तासखेडा)