धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा-अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे हे फलक तत्काळ योग्य ठिकाणी लावावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे युवानेत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
धरणगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला सध्या आपल्या भोंगळ कारभारालामुळे राजकीय नेत्यांसह नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तशात आता दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने अमळनेरकडे जाणारे प्रवाशी अनेकदा कोर्टाच्या दिशेने वाहन वळवितात. पुढे गेल्यावर लक्षात येते की, आपण रस्ता भरकटलो आहेत. अनेकवेळा रात्रीच्या वेळेस कार, दुचाकीवर जाणारे दाम्पत्य रस्ता चुकल्याने भयभीत झाल्याचे प्रकार घडले आहेत. भविष्यात यातून काही विपरीत घटना देखील घडू शकते, अशी भीती व्यक्त करत चंदन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे दिशादर्शक फलक पाटाच्या अलीकडे न लावता पलीकडे लावण्याची सूचना केली आहे. यामुळे वाहनधारक रस्ता चुकणार नाहीत. खरं म्हणजे फलक लावण्यातांच या गोष्टीचा विचार झाला पाहिजे होता. परंतू सार्वजनिक विभागात कुणी कुणाला काही विचारात नाही. तसेच वरिष्ठ अधिकारीच जर कार्यालयात येत नसतील. तर कर्मचारी अशा पद्धतीच्या गंभीर चुका करतीलच, असा टोला देखील चंदन पाटील यांनी लगावला आहे.