धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. धरणगावात राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया जोरात सुरु झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिंदे गटाकडून प्रबळ उमेदवाराचा शोध युद्ध पातळीवर सुरु असला तरी भविष्यात अपेक्षित तथा अनेपक्षित आघाड्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिंदे गटाकडून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. यंदा पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असून त्यातून अंतिम उमेदवार निवडतांना वरिष्ठांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळी या बातमीतून जाणून घेऊ या…धरणगावातील राजकीय पक्षात नेमकं काय सुरु आहे आणि नेते काय म्हणताय?.
शिवसेनेकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरु
शिवसेनेकडून मुलाखतींद्वारे प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मागील दोन दिवसात शिवसनेचे बहुतांश उमेदवार निश्चित झाले असल्याचे कळतेय. एवढेच नव्हे तर, मॅरेथॉन पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसह गावातील प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यात आला आल्याचेही कळतेय. तर माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी आणि राजेंद्र चौधरी हे उमेदवारांची निवड प्रक्रियेत सहभागी आहेत. तसेच शिवसेना परत एकदा मोठ्या जोशात पालिका पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागली असून उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. दरम्यान, राज्यातील घडामोडीनंतरही शिवसेनेने गावात बऱ्यापैकी ‘डॅमेज कंट्रोल’ केल्यामुळे शिवसेनेत जोश बघायला मिळत आहे.
शिंदे गटाकडूनही उमेदवारांची चाचपणी
राज्यातील सत्तांतरानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील अर्थात शिंदे गटाकडूनही उमेदवारांचा शोध सुरु आहे. आमच्याकडे इच्छुकांची गर्दी असली तरी त्यातून निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निकष महत्वाचा आहे. गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढणार असून काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून गुलाबभाऊ मुंबईहून परत आल्यावर पुढील मुलाखती होतील, अशी माहिती असल्याची माहिती राजेंद्र महाजन यांनी दिली आहे. तर या प्रक्रियेट गटनेते पप्पू भावे, संजय चौधरी, विलास महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी नगरसेवक अभिजित पाटील कार्यरत असल्याचेही राजेंद्र महाजन यांनी दिलीय. तर गुलाबराव पाटील यांचा गट पालिकेत सत्ता शाबूत ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावून निवडणूक लढेल, हे निश्चित आहे. तसेच गुलाबराव पाटील धरणगावात आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित
पालिकेच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने जवळपास उमेदवार निश्चित करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय. भाजपने आजच्या घडीला सर्वच प्रभागात उमेदवार फायनल केले आहेत. राज्यातील राजकीय गणित बदलल्यामुळे कदाचित काही उमेदवार बदलतील. परंतू आजच्या घडीला भाजपचे सर्व उमेदवार कामाला लागले आहेत. भाजपकडून शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, सुभाष पाटील, पी.सी. पाटील, अॅड. संजय महाजन, जिजाबराव पाटील,पालिकेतील गटनेते कैलास माळी, भूषण कंखरे दिलीप महाजन, कन्हैय्या रायपुर ही मंडळी उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेत आहेत. तर आमची २३ प्रभागातील उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. परंतू वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच स्थानिक रणनीती ठरवली जाईल. तूर्त आमची तयारी पूर्ण झाली असून आम्ही निवडणुकीस सामोरे जाण्यास सज्ज असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून दमदार उमेदवार देण्याचा प्रयत्न
धरणगावात कधीकाळी सत्ताकेंद्रात प्रमुख असलेली राष्ट्रवादी यावेळी पुन्हा जोशात आली आहे. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या जोशात आहे. तर राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून काही उमेदवार निश्चित झालेय. तर काही उमेदवार येत्या काही दिवसात निश्चित होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली आहे. परंतू अंतिम निर्णय माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे घेतील असेही श्री. महाजन यांनी सांगितले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, मोहन पाटील, निलेश चौधरी, संभाजी कंखरे ही मंडळी पालिकेसाठी उमेदवार चाचपणी प्रक्रियेत काम करत आहेत.
कॉंग्रेस ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
कॉंग्रेसने धरणगाव पालिकेच्या दृष्टीने काही उमेदवार निश्चित केल्याचे कळतेय. कॉंग्रेसने मागील काही दिवसात विविध आंदोलन करून लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनामुळे कार्यकर्ते जोशात आहेत. आमचे काही उमेदवार निश्चित झाले असून पुढील काही दिवसात आणखी काही उमेदवार निश्चित होतील. परंतू तूर्त आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून अंतिम निर्णय डी.जी. पाटील साहेब घेतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी यांनी दिलीय. तर चंदन पाटील, महेश पवार, राजेंद्र न्ह्यायदे, सम्राट परिहार, सुरेश भागवत आदी मंडळी कॉंग्रेसचे उमेदवार ठरवणार आहे.
















