नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाकडून बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या २४३ जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे.
बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार. त्यानुसार पहिल्या टप्प्यात – ७१ मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात – ९४ मतदारसंघ तर दुसऱ्या टप्प्यात – ७८ मतदारसंघात मतदान होणार. उमेदवारांना सिक्युरिटी डिपॉझिटही ऑनलाईन जमा करावे लागेल. यंदा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. सर्व मतदान केंद्र तळ मजल्यावरच असतील. उमेदवारांबद्दल वेबसाईटवर माहिती द्यावी लागेल. उमेदवारांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक केली जाईल. सोशल मीडियाचा वापरदेखील एक आव्हान आहे. सोशल मीडियाद्वारे कुणीही समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यंदा निवडणुकीसाठी केवळ व्हर्च्युअल प्रचार केला जाईल. मोठ-मोठ्या जनसभा भरवता येणार नाहीत,असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ७ लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर ४६ लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर ६ लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील. कोरोना काळात बिहारमध्ये सर्वात मोठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे.