जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना पारोळा तालुक्यातील धाबे येथील जि.प.प्राथ शाळेतील ३ सप्टेंबर रोजी १३५ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून कार्यक्रम घेणाऱ्या शिक्षकाला निलंबित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मनविसेच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील धाबे येथील जि.प.शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सप्टेंबर महिन्यात गावातील जि.प.शाळेत विविध १३५ आदीवासी बालकांना गणवेश वाटप करण्याचे काम केले. हे काम उत्तमच होते, त्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. परंतू वेळ चुकीची होती. जगासह महाराष्ट्रावर मार्च महिन्यापासून कोरोना संक्रमणाचे महाभयंकर संकट असतांना सुध्दा या शिक्षकांनी निव्वळ आपल्या प्रसिध्दीच्या हव्यासापोटी १३५ विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात टाकून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्याध्यापक श्री.साळुंखे यांनी राज्यशासनाच्या नियमांची पायमल्ली करीत कुठलेही सामाजिक अंतर न ठेवता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचे फोटो व वृत्तपत्रातील बातम्यामधून दिसून येत आहे. आपल्या प्रसिध्दीसाठी जे काही कृत्य केले आहे, त्याबाबत शिक्षणाधिकारी साहेबांनी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मनविसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.