मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे.
‘सामना’तील रोखठोक सदरात मुंबई विषयी लिहिलेल्या लेखात राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. ‘महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,’ अशी राऊत यांनी म्हटले आहे.