नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र सुरूच आहे. अशातच काल रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केला असल्याचा आरोप चीनने केला आहे.लडाखच्या पँगाँग सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.
चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चिनी लष्कराचे वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने पँगाँग सोच्या नजीक चकमक झाल्याचा दावा केला आहे. “भारतीय लष्कराने पँगाँग सो नजीक असलेल्या शेनपाओ या ठिकाणी एलएसी ओलांडली. चर्चेचे प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या बॉर्डर पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर भारतीय जवानांनी वॉर्निंग शॉट्स फायर केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या जवानांनाही कारवाई करावी लागली,” असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
“भारताने द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केले आहे. यामुळे या क्षेत्रात तणाव आणि गैरसमज वाढतील. ही एक गंभीर कारवाई होती. अशाप्रकारची पाऊलं उचलणं भारताने थांबवावे आणि ज्या जवानांनी गोळीबार केला त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याची काळजी भारताने घ्यावी. पीएलएचे वेस्टर्न कमांडचे सैनिक आपल्या कर्तव्यांचं पालन करतील आणि देशाच्या सुरक्षेसाठीही ते कटिबद्ध आहेत,” असे पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते झांग शुई यांनी सांगितले.