नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मला हिरेन जोशीजींना एकच सांगायचे की, तुम्ही पाठवलेले मेसेज आणि धमकीचे स्क्रीनशॉट मी सोशल मीडियावर टाकलेत तर तुम्हाला आणि पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे धमक्या देणे बंद करा, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे.
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या वतीने आज देशभरातील ‘आप’च्या लोकप्रतिनिधींचे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर अनेक आरोप केले. एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांच्यावर पत्रकार आणि माध्यमांच्या संपादकांना धमकावल्याचा आरोपही केला.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हिरेन जोशी हे पीएम मोदींच्या कार्यालयात मीडिया सल्लागार म्हणून काम करतात. अनेक मोठ्या वाहिन्यांचे मालक आणि संपादकांनी हिरेन जोशी यांच्याकडून आलेले धमक्यांचे मॅसेज मला दाखवले होते. केजरीवालांना आणि आम आदमी पक्षाला बातम्यांमध्ये स्थान द्याल तर याद राखा. आम आदमी पक्षाला बातम्यांमध्ये दाखवण्याची काहीही गरज नाही, अशा धमक्या देत आहेत. धमक्या देऊन देश चालवणार का, असा सवालही केजरीवाल यांनी केला. मला हिरेन जोशीजींना एकच सांगायचे की, तुम्ही पाठवलेले मेसेज आणि धमकीचे स्क्रीनशॉट मी सोशल मीडियावर टाकलेत तर तुम्हाला आणि पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे धमक्या देणे बंद करा,असेही केजरीवाल म्हणाले.