जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले असून हतनूर धरणातूनही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी व गिरणासह जिल्ह्यातील इतर नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदी काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन सुरक्षित रहावे. काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदीपात्रातून पाणी वाहत आहे. पाऊस सुरूच राहिला तर आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होवू शकते. अशावेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे व आपला बचाव करावा. त्याचबरोबर नदीपात्र व लगतचे नाले, ओढे यामध्ये जनावरे जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडू नये व वाहने नेऊ नये. असे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी केले आहे.