भुसावळ (प्रतिनिधी) केंद्रातील मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी करून केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेसच्या वतीने आज भुसावळ प्रांतधिकारींना निवेदन देण्यात आले.
प्रांतधिकारींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा. तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला?, असा प्रश्न उपस्थीत करण्यात आला आहे. या निवेदनावर रहीम कुरेशी, पंकज पाटील, मेहबूब खान, विवेक नरवाडे, कुणाल सुरळकर, अॅड. शरद तायडे, अॅड. रम्मू पटेल, सुजाता सपकाळे, इस्माईल गवळी, गफ्फार गवळी, विजय तुरकेले, विनोद पवार, सपना पगारे, सुनील जोहरे यांचा स्वाक्षऱ्या आहेत.