पिंपरी (वृत्तसंस्था) शिवीगाळ केली म्हणून दोघांनी मिळून मित्रावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. त्यानंतर मित्राचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही घटना शनिवारी (दि. १२) सकाळी चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ उघडकीस आली.
गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे ( वय १८, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक उर्फ डल्या गायकवाड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा मुलगा गणेश, आरोपी अभिषेक आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे फेकून दिला. ९ ऑगस्ट रोजी तिघेजण चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात गणेशने अभिषेक याला शिवीगाळ केली.
या शिवीगाळ करण्याचा राग अभिषेक आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला आला. त्या दोघांनी कोयत्याने गणेश याच्या शरीरावर ठिकठिकाणी वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या गणेशचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर दोघांनी गणेशचा मृतदेह मैदानात असलेल्या विहिरीत फेकून दिला.
गणेश बेपत्ता झाल्याने त्याच्या घरचे शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी चिंचवड स्टेशन जवळील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली असता तो मृतदेह गणेश याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण तपास करीत आहेत.