मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील २५ पैकी २३ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अधिकार्यांना भारतीय प्रशासन सेवेत २ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पदोन्नती प्राप्त झाली आहे. यासाठी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा. रक्षाताई खडसे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
महाराष्ट्र शासनातील आयएएस संवर्गात एकूण ४१५ जागा आहेत. त्यापैकी सन २०१८ मध्ये केंद्र शासनाकडून केवळ ३१८ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून ९७ जागा रिक्त होत्या. त्या ९७ रिक्त जागांपैकी २०१८ या वर्षाकरीता पदोन्नतीने २५ जागा महाराष्ट्र शासनातील अधिकार्यांकरीता उपलब्ध झाल्या होत्या. परंतु २५ जागांसाठी पदोन्नती समितीची बैठक संघ लोकसेवा आयोगाकडून तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाकडून आयोजित केली जात नव्हती.
कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात सगळे कामकाज ठप्प झाल्याने त्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. खा. रक्षाताई खडसे यांनी हा प्रश्न लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समिती समोर उपस्थित केला व अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अनेक अधिकारी पदोन्नतीस पात्र असूनही २०१८ पासून आयएएस पदावरील पदोन्नती समितीची बैठक आयोजित झालेली नसल्याने त्यातील काही अधिकारी सेवानिवृत झाल्याने मागास वर्ग कर्मचार्यांवर अन्याय झाल्याची बाब समितीसमोर मांडली. लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीचे अध्यक्ष खा. गणेश सिंह यांनी या प्रकरणाची तातडीची निकड लक्षात घेऊन कोविड -१९ विषाणूच्या साथीच्या नियमावलीप्रमाणे सदर प्रकरणी तातडीने इतर मागास वर्ग कल्याण समितीची बैठक दि.२९ जून रोजी घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयास याप्रकरणी पदोन्नती समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत, असे खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
समितीच्या निर्देशाप्रमाणे केंद्र शासनाने संघ लोकसेवा आयोगाकडे पदोन्नती समिती आयोजित कारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार दि.३ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने राजपत्रात या पदोन्नतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीने खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विनंतीप्रमाणे केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयास याप्रकरणी पदोन्नती समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याचे निर्देश दिल्यामुळे आज कोरोना विषाणू काळात महाराष्ट्र शासनास २३ आयएएस अधिकारी मिळाले असून प्रशासन त्यामुळे मजबूत झाले आहे व तीन वर्षापासून भाप्रसेमध्ये पदोन्नती रखडलेल्या अधिकार्यांना न्याय मिळाले आहे. विशेष म्हणजे २३ पैकी २ अधिकारी पदोन्नतीविना सेवानिवृत्त झाले होते. आता त्यांना पुन्हा भाप्रसेमध्ये नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२३ नामनिर्देशित आयएएस अधिकार्यांमध्ये ६ इतर मागास वर्ग, २ भटके व विमुक्त, १ अनुसूचित जाती, ३ आदिवासी आणि ११ खुल्या प्रवर्गातील अधिकारी आहेत. याप्रकरणात रावेर लोकसभा मतदार संघाचे खा. श्रीमती रक्षाताई खडसे व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खा.ओम राजे निंबाळकर यांचे व लोकसभेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीचे अध्यक्ष खा. गणेश सिंह व समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. याबद्दल खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सर्वांचे आभार मानले.