पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा, भडगाव तालुक्यातील गिरणा, तितुर व गडद यातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या तिघंही नदीपात्रातून वाळू वाहतूक उत्खनन करण्यास वाहनांना प्रतिबंध करण्याचे आदेश आज उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, तिघंही नदीपात्रात अधिकृत लिलाव देण्यात आलेले नसून अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द, पुनगाव, मांडकी, ओझर, अंतुर्ली बुद्रुक प्र.चा, भातखेडे खुर्द, परधारडे, बहुळेश्वर, दुसखेडे, कुरंगी, महिजी, वरसाडे प्र.बो, बाळद बुद्रुक, नाचणखेडे, होळ, सांगवी बुद्रुक, घुसर्डी बुद्रुक, वडगाव खुर्द, पिंपरी बुद्रुक तसेच भडगाव तालुक्यातील सावदे,टोणगाव, बांबरुड, गिरड, कराब, वडदे, पिंपळगाव बुद्रुक, भट्टगाव, अंतुर्ली बुद्रुक, भातखंडे बुद्रुक, नावळे, बाळत खुर्द गिरड व कोठली या गावातील गिरणा तितुर व गडद यातील नदीपात्रातून वाहनाने वाळू वाहतूक होऊ नये तसेच वाळूमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या तिघे नदीपात्रातून वाळू वाहतूक उत्खनन करण्यास (बैलगाडीसह) वाहनांना प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिघंही नदीपात्रातून वाळू वाहतूक उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीने वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.