जळगाव प्रतिनिधी । पेट्रोलियम मंत्रालयाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या रिटेल सेल प्राइजनुसारच घरपोच गॅस पुरवण्यासाठी दर आकारणे एजन्सीधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठरवून देण्यात आलेले वाहतुकीचे दर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रद्द केले आहे. तसेच रिटेल सेल दरामध्ये घरपोच गॅस सिलिंडर देणे एजन्सीधारकांना बंधनकारक केले आहे. त्यापेक्षा जास्त दर घेणार्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच शहरी भागात अनधिकृतपणे घेण्यात येणारे १० रुपये दर घेऊ नये अशी सूचनाही देण्यात आली आहे.
शहरी भागात देखील एजन्सी- धारकांकडून घरपोच सिलिंडर पोहचवितांन अतिरिक्त १० रुपये घेण्यात येत होते. ग्रामीण भागात किलोमीटरनुसार २३ ते ३५ रुपयांपर्यंत वाहतूक दर एजन्सीधारकांना ठरवून देण्यात आलेले होते. मात्र आता ते रद्द करण्यात आले. सप्टेंबर महिन्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने घरपोच गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी ६०० रुपये रिटेल सेल प्राइस ठरवून दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त पैसे ग्राहकांना द्यावे लागणार नाही. आयओसीएल, बीपीसीएल व एचपीसीएल या तीनही पेट्रोलियम कंपनी अंतर्गत कार्यरत असलेल्या गॅस एजन्सीला वाहतुकीचे अतिरिक्त दर निश्चित करून देण्याची कार्यवाही ही फक्त डोंगराळ, पर्वतमय व लष्करी दृष्टिकोनातील भूप्रदेशासाठी लागू आहे.
घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या प्रति गॅस सिलिंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला ६१.८४ पैसे एवढे कमिशन मंजूर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस एजन्सीसाठी ३४.२४ पैसे आस्थापना खर्चासाठी व २७.६० पैसे एवढी रक्कम त्यांना वाहतुकीसाठी मंजूर केलेली आहे. तसेच ५ किलोग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीसाठी एकूण ३०.९२ पैसे एवढे कमिशन मंजूर केलेले असून, त्यात १७.१२ पैसे आस्थापना खर्चासाठी व १३.८० पैसे एवढी रक्कम वाहतुकीच्या खर्चासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालय व नैसर्गिक गॅस यांनी वेळोवेळी घोषित होणार्या रिटेल सेल प्राइस प्रमाणेच गॅस सिलिंडरची विक्री करणे बंधनकारक केले आहे.
ग्राहकांना करता येईल तक्रार
गॅस सिलेंडर घरपोच पुरवण्यासाठी वाहतुकीच्या दरवाढीचे जिल्हाधिकार्यांनी दिलेले आदेश रद्द केले आहे. एजन्सीधारक रिटेल सेल प्राइसपेक्षा जास्त पैसे मागत असल्यास बीपीसीएलच्या १८००२२४३४४, आयओसीएल १८००२३३३५५५ व एचपीसीएल १८००२३३३५५५ या कस्टमर केअर क्रमांकावर तक्रार करावी, असे भारत पेट्रोलियमचे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक स्वप्निल श्रीवास्तव यांनी सांगितले. कार्यक्षेत्राबाहेर १ ते १० किलोमीटरपर्यंत २२, १० ते २० किलोमीटरपर्यंत ३१ व २० किलोमीटरच्या पुढे ३५ रुपये दरवाढ करण्यात आलेली होती. ही दरवाढ रद्द करण्यात आलेली आहे.
सेल रिटेल प्राइस व्यतिरिक्त जादा दर घेतल्यास कारवाई
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेळोवेळी घोषित होणार्या सेल रिटेल प्राइसप्रमाणे गॅस सिलिंडरची विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही गॅस वितरकांनी त्यांना ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दराने गॅस सिलिंडरची विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.