चाळीसगाव (प्रतिनिधी) व्याजाच्या पैशाच्या वादातून सेंट्रल बँकेसमोर काही तरुणांमध्ये रविवारी रात्री राडा झाला. यात माजी नगरसेवकाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून ९ ते १२ जणांविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकित महेंद्र मोरे (१५) या तरुणाला व्याजाने दिलेले पैसे का परत केले नाही? तसेच अंबड पोलीस स्टेशनला तक्रार का केली? अशी विचारणा करत संशयित आरोपींनी चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. यात अंकित मोरे यासह हर्षल राठोड हा तरूणही जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुमित भोसले, संतोष निकुंभ, श्याम चव्हाण, सुधीर शिंदे, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, कृष्णा गायकवाड, योगेश पांचाळ, विक्की पालवे यासह इतर तीन ते चार जणांवर चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.















