नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘झेनुआ डाटा’ या चिनी माहिती तंत्रज्ञान कंपनीने भारतातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचेच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांचीही हेरगिरी केली असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
याबाबत लोकसत्ताने आज पुन्हा वृत्त प्रकाशित केले आहे. इंडियन एक्स्प्रेस’ने ‘झेनुआ डाटा’ या चिनी तंत्रज्ञान कंपनी अति महत्वाच्या भारतीयांवर पाळत ठेवून असल्याचा गौप्यस्फोट केला होता. पाळत ठेवलेल्या भारतीयांमध्ये जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतातील राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांसह, अनेक राजकीय नेत्यांचा समावेश होता. परंतू आता ‘झेनुआ डाटा’ कंपनी भारतीय रेल्वेत भरती होणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांपासून उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या गुंतवणूक कंपनीच्या अधिकाऱ्यापर्यंतची माहिती जमा केली आहे. एवढेच नव्हे तर, भारतीय नवअर्थव्यवस्थेतील जवळपास सर्व घटकांची, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमींची आणि ‘पेमेंट अॅप’पासून आरोग्यापर्यंतच्या विविध अॅप्सच्या माहितीचे संकलन केले आहे. त्याबाबतच्या १,४०० नोंदी ‘दी इंडियन एक्स्प्रेसने’ उघडकीस आणल्या आहेत. भांडवल पुरवठादार कंपन्या, महत्त्वाचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमी कंपन्या, त्यांचे संस्थापक आणि प्रमुख, इ-कॉमर्स कंपन्या आणि भारतीय वंशाचे परदेशी गुंतवणूकदार यांची माहितीही ‘झेनुआ डाटा’ कंपनीने संकलित केली आहे. महिंद्रा समूहाचे मुख्य वित्त अधिकारी, रिलायन्स समूहातील अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीगी, नायका, उबर, पे यू आदी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतच्यानोंदीही ‘झेनुआ डाटा’ने साठवल्याचे आढळले. १२ विद्यमान किंवा माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे नातेवाईक; ऊर्जा, जलसंसाधन, सिंचन, नदी विकास आणि सार्वजनिक बांधकाम यांसारखी पायाभूत सुविधाविषयक खाती सांभाळणारे विद्यमान मंत्री, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील अनेक महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी या यादीत आहेत. विशेष म्हणजे या डेटाबेसमध्ये, भारत आणि चीनमध्ये सीमा संघर्ष झालेल्या लडाखसह काश्मीरमधील ३० महत्त्वाचे नेते आणि नोकरशहा यांचा समावेशही ‘झेनुआ डाटा’च्या माहितीमध्ये आहे.