दुबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये IPL २०२०चा पहिला सामना रंगला. मुंबई इंडीयन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला.
चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली. चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसन पहिल्या दोन षटकातच स्वस्तात माघारी फिरले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिसने डाव सावरला. अंबाती रायडूने सर्वाधिक ७१ धावा केल्या तर फाफ डू प्लेसिस ५८ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. मलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने अवघ्या एका धावेवर त्याला बाद केले. शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) हे दोघे स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. अनुभवी अंबाती रायडूने संयमी खेळ करत ३३ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. अतिशय भक्कम अशी डु प्लेसिस-रायडू यांची भागीदारी अखेर राहुल चहरने तोडली. रायडू ७१ धावांवर झेलबाद झाला. जाडेजाही १० धावांत बाद झाला. त्यानंतर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.