जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाला हादरवून सोडणाऱ्या दोन बातम्या सोमवारी रात्री समोर आल्या आहेत. पहिली बातमी गुन्हेगारी क्षेत्रातील आहे. तर दुसरी बातमी राजकीय वजा सहकार क्षेत्राशी निगडीत आहे. जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रा. डी.डी बच्छाव व किरण बच्छाव यांच्या घरावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी लुटपाट करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे जळगाव दूध संघातील अपहारप्रकरणी एमडी मनोज लिमयेंसह चौघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
दूध संघातील अपहारप्रकरणी एमडी मनोज लिमयेंसह चौघांना अटक
दूध संघातील सुमारे चार लाख रुपयांच्या तुपाचा अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना शहर पोलिसांनी सोमवारी रात्री ११ वाजता अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक शक्यता आहे. दरम्यान, सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, त्याआधीच अटकसत्र सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
जिल्हा दूध संघातून तुपाची परस्पर विक्री करून अपहार केल्याचा सर्वात पहिला गुन्हा सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आला. यानंतर लिमये यांनी लोणी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. यानंतर आणखी दोन तक्रारी आल्या होत्या. यातील जबाबानुसार दूध संघात एकूण १ कोटी १५ लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तूप चोरी प्रकरणात डेप्युटी एमडी शैलेश मोरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोमवारी मनोज लिमये यांना अटक केली. गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे नमूद केले आहे.
एमडी लिमये यांच्यावर अपहार केल्याचा संशय
या प्रकरणात सुरुवातीला लिमये यांनी दूध संघात चोरी झाल्याची तक्रार केली होती. नंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुसऱ्या एका तक्रारीत एमडी लिमये यांच्यावरही अपहार केल्याचा संशय होता. त्यानुसार डेप्युटी एमडी शैलेश मोरखडे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यानंतर लिमये यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शहरातील विठ्ठल रुख्मिणी एजन्सीचे मालक किशोर काशिनाथ पाटील व चालक हरी रामू पाटील यांनाही अटक केली.
जळगावातील प्रसिद्ध वाहन व्यवसायिक बच्छाव यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न
जळगावातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रा. डी.डी बच्छाव व किरण बच्छाव यांच्या घरावर सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करीत पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लुटपाट करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड झाल्याने दरोडेखोरांनी पळ काढला.
अशी घडली थरारक घटना
सोमवारी रात्री ८.४५ वाजता किरण बच्छाव हे मागच्या खोलीत बसले होते. तर त्यांच्या पत्नी स्वयंपाकघरात होत्या व मुलगा टीव्ही बघत होता. वॉचमन कुत्र्याला फिरविण्यासाठी घेऊन गेला होता. रात्री ९ वाजता अचानक घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. वैदांती या दरवाजाजवळ आल्यावर त्यांनी आतूनच काय काम आहे असे विचारले. कुत्रा फिरवायला गेलेले तुमचे वॉचमन बाबा रस्त्यावर चक्कर येऊन पडले आहे, असे दोघांनी सांगितले. त्यामुळे काय झाले असावे? या विचारातच वेदांती यांनी लागलीच दार उघडले. अन् दुसऱ्याच क्षणी हातात पिस्तूल, चाकूसारख्या शस्त्रासह तोंडावर मास्क लावलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी एकामागून एक घरात प्रवेश केला. त्यातील दोघांनी सुरूवातीला वैदांती यांचा गळा पकडून स्वयंपाक घरापर्यंत ओढत नेले. त्यामुळे त्या आरडा-ओरड करू लागल्या.
पुढच्या मुख्य दरवाजानेच घरातून पळ काढला
यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव दाम्पत्याला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला. किरण बच्छाव यांच्या मुलाला दरोडेखोर यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर बच्छाव यांनी मुलाला काही झाले तर याद राखा असा इशारा दिला. या झटापटीत जोरजोरात आरडा-ओरड होत असल्यामुळे बाहेर उभा एक दरोडेखोर इतरांना लवकर निघा, लवकर निघा म्हणत होता. तेवढ्यात बच्छाव दाम्पत्याने आणखी जोरजोरात आरडा-ओरड केली. दरोडेखोरांनी घराचा मागचा दरवाजा कुठे आहे?, अशी विचारणा केली. बच्छावांनी मागे दरवाजा नाही, असे सांगितल्यावर दरोडेखोरांनी पुढच्या मुख्य दरवाजाने घरातून पळ काढला. दरम्यान, यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हेशाखा, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसांचा ठाण्याचा फौजफाटा बच्छाव यांच्या घरी पोहचला होता.