जळगाव एमआयडीसीत धाडसी चोरी ; बारा लाखाचा रोकड लंपास
जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील सेक्टर व्ही २३ मधील स्वामी पॉलिटेक या कंपनीत अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत तब्बल १२ लाख ६८ हजारांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
भरत हरिषकुमार मंधान (वय ३५) यांची एमआयडीसीत स्वामी पॉलिटेक या नावाने प्लास्टीक मोल्डेड ही कंपनी एमआयडीसीतील सेक्टर व्ही २३ मध्ये आहे. शुक्रवारी पहाटे साधारण अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेजारच्या भिंतीवर चढून कंपनीत उडी मारली. त्यानंतर लाकडी कपाटाच्या दरवाजाचे कुलूप तोडून तेथील कापडी पिशवीतील १२ लाख ६८ हजारांची रोकड लांबवत चोरटा पसार झाला. सीसीटीव्हीत चित्रीत झालेल्या वेळेनुसार चोरटा २ वाजून ४१ मिनिटांनी कंपनीत शिरला आणि ३ वाजून ३१ मिनिटांनी बाहेर पडला असल्याचे दिसत आहे.