मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कृषी महामंडळ अथवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरीच्या 25 वर्षीय तरुणाची साडेतेरा लाखात फसवणूक झाली होती. याप्रकरणी सुरूवातीला एका संशयिताला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अमरावतीच्या संशयिताला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन वानखेडे (अमरावती) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे फसवणूक प्रकरण
फकिरा अर्जुन सावकारे (25, भोकरी, ता.मुक्ताईनगर) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी 12 वी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा.जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, मी माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय, जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखविले. त्यानंतर शेख जावेद शेख रहीम या मित्रासमोर 5 ऑगस्ट 2021 रोजी सावदेकर यांना 5 लाख रोख दिले.
दुध फेडरेशनमध्ये दिला पेपर
त्यानंतर काही कालावधीनंतर सावदेकर यांनी दुध फेडरेशन जळगाव येथे जागा निघाल्या असुन तेथे फॉर्म भरुन दे, मी पेपरचे पाहुन घेईल, असे फकीरा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी जळगाव दुध फेडरेशन येथे पेपर दिला व परीक्षेत पास झाले. यानंतर कन्फर्म ऑर्डर काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावदेकर यांना पुन्हा 12 डिसेंबर 2021 रोजी कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालय, जळगाव येथे पाच लाख रुपये देण्यात आले. यावेळी सावदेकर म्हणाले की, आता तुझी मुलाखत व कागदपत्रे पडताळणी होईल त्यासाठी तुला परत साडेतीन लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मार्च 2022 महिन्यात त्यांना पुन्हा साडेतीन लाख दिलेत.
परंतू पैसे घेऊन ऑर्डरसाठी फकीरा यांनी विचारणा केली असता सावदेकर यांनी ते उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागले. त्यानंतर सावदेकर यांनी फकीरा यांना दोन लाख रुपये किंमतीचा जे.डी.सी.सी.बँकेचा चेक दिला होता परंतू तो चेक तो बाउन्स झाला यानंतर मा, फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली 13 लाख 50 हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, वानखेडेच्या अटकेनंतर परीक्षेत नेमका कसा घोळ करण्यात आला होता?,यात कोणकोण सहभागी होते?, याची माहिती पोलीस चौकशीत समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात याआधी एका संशयितला अटक करण्यात आली होती तर अन्य एक फरार होता. आता अटकेतील संशयितांची संख्या दोनवर पोहचली आहे.
















